
‘मुंबईसाठी ही महापालिका निवडणूक म्हणजे संयुक्त महाराष्ट्रानंतरचा सर्वात मोठा लढा आहे. या लढय़ात सर्व मुंबई व महाराष्ट्रप्रेमी आमच्या सोबत आहेत,’ असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मांडला. ‘मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत आहे, एका उद्योजकाला देण्याचा प्रयत्न होत आहे, भाजपच्या मालकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे, बिल्डर आणि कॉण्ट्रक्टरचं साम्राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापासून मुंबईला वाचवायचे आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुद्दय़ाचं बोलणारा आमचा एकमेव पक्ष
‘निवडणूक आली की भाजपला हिंदू-मुस्लिम आठवते. आम्ही मुद्दय़ावर निवडणूक लढवत आहोत. गेल्या अनेक वर्षांत आम्ही जी-जी वचने दिली, ती पूर्ण करून दाखवली. असा आमचा एकमेव पक्ष आहे. कोस्टल रोड, एसटीपीचे काम, मोकळी मैदाने, शाळा, झू ही सगळी कामे आमची आहेत. त्या आधारावरच आम्ही निवडणूक लढतो आहोत,’ असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मिंध्यांना ‘वन टू वन’ चर्चेचे आव्हान
मुंबई व महाराष्ट्रातील विकासकामांवर ‘वन टू वन’ चर्चा करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिधेंना दिले. ‘नगरविकास खात्यातले त्यांना काय कळते हे मला सांगावे. माझ्या समोर येऊन बसा. तुम्ही पेपर घेऊन बसा. मी विनापेपर बसतो. तीन वर्षांपासून मी चर्चेचे आव्हान देतोय. मुंबईच्या विकासावर व घोटाळ्यांवर चर्चा करा. समोरासमोर बसून बोलू,’ असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले.

































































