शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची टीका

परतूर येथील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याची परवानगी न दिल्याने सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर नाना पटोले यांनी वेलमध्ये उतरून विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला. त्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याविरोधात विरोधकांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला.

‘बबनराव लोणीकरांनी जे काही भयानक शब्द बळीराजासाठी वापरले आहेत. असे शब्द आपण कधी उच्चारू शकत नाही. असे कधी विचार मनात येत नाही. आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कुणीतरी किंवा लोणीकरांनी स्वत: शेतकऱ्यांची माफी मागितली असती तर विषय तिथेच संपला असता. पण स्थगन प्रस्ताव मांडू न देणं. त्याच्यावर काही बोलायचं नाही. याचा अर्थ बबनराव लोणीकर यांच्या मताशी सरकार आणि भाजप सहमत आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं. त्यानंतर नाना पटोलेंना निलंबित केलं आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, ”धक्कादायक गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी नाना पटोलेंना निलंबित केलेलं आहे. हा भयानक पायंडा या सरकारने पाडला. हे सरकार शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नाही तर निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे. शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचनं दिली ती न पाळता, त्यांचा अपमान करून तुम्हाला सत्ताधारी बाकावर बसता येतं हे सरकारने दाखवून दिलेलं आहे. नाना पटोलेंचं जे निलंबन झालं आहे त्यामुळे आम्ही आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, असे देखील ते म्हणाले.