परदेश दौऱ्यावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांची ‘सहल’ रद्द, आदित्य ठाकरे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 1 ऑक्टोबर पासून लंडन आणि बर्लिन शहरांच्या दहा दिवसाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र या दौऱ्याचे वेळापत्रक मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केले नव्हते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यांच्या ट्विटच्या अर्ध्या तासानंतरच मुख्यमंत्री कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावरून आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

”घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या बहाण्याने आयोजित केलेल्या परदेशी पर्यटनावर प्रश्न विचारणारे ट्विट मी काल केले होते. माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. यावरून स्पष्ट होते की, हा दौरा म्हणजे राज्याच्या कामासाठीची बैठक नसून निव्व्ळ परदेशवारी होती. मागे देखील दावोसच्या 28 तासांच्या सहलीवर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी करदात्यांच्या 40 कोटींचा चुराडा केला होता. सरकारच्या परदेश दौऱ्यातून राज्याला काही लाभ होणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही पण करदात्यांच्या पैशावर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी सुट्टीवर जाणे, आम्हाला मंजूर नाही. मी प्रश्न विचारताच ही ‘सहल’ रद्द झाली”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.