रस्ते पाहणी दौऱयाचे नाटक करणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी त्यांच्या लाडक्या पंत्राटदारांची यादी बनवून किती रस्ते बांधले त्याचीही पाहणी करावी, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज लगावला. दोन वर्षांत रस्ते खड्डेमुक्त करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात दिले होते, त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.
ऑगस्ट क्रांती मैदानात गांधी स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा गुजरातच्या आदेशावर चालणारा
– दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला का या प्रश्नाला उत्तर देताना, आधी महायुतीचा चेहरा ठरू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महायुतीचा चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का हे आधी पाहावे लागेल. कारण त्यांचा चेहरा गुजरातच्या आदेशावर चालणारा आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
राम मंदिराच्या आसपासची हिंदूंची जमीन कोणाला दिली?
– केदारनाथमधून तीनशे किलो सोने गायब झाल्याचे शंकराचार्य म्हणाले होते. भाजप त्यावर उत्तर देत नाही. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा गप्प का? सीएएबाबत बोलणारे, आश्रय देण्यासंदर्भात दावा करणारे भाजपवाले आता गप्प का? अयोध्येत राममंदिराच्या आसपासची हिंदूंची जमीन पुणाला दिली गेली, लोढा तिथे आश्रम बांधणार की तिचा व्यावसायिक वापर करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
मिंधे सरकारला चले जाव करण्यासाठी प्रेरणा घेतली
– ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जाव असा नारा दिला होता. सध्या देशात आणि महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत ज्या बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील देशद्रोही मिंधे सरकारलाही चले जाव करण्यासाठी आज आपण इथून प्रेरणा घेतली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. स्वातंत्र्याची लढाई आणि मिंधे सरकारविरुद्धची लढाई यांची तुलना आपण करणार नाही. कारण गद्दारांशी तुलना केली तर हुतात्म्यांचा अवमान होईल, असेही ते म्हणाले.