
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्या ठाकरे यांनी खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेवरून मिंधे सरकारवर निशाणा साधला. या घटनेत किती श्रीसेवकांचे मृत्यू झाले ती संख्या का लपवली जात आहे? असा सवाल त्यांनी मिंधे सरकारला केला आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला काही सवाल केले आहेत.
”खारघरमधला कार्यक्रम नियोजनशून्य होता. या सगळ्याचं कंत्राट कुणाला दिलं होतं? महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारींना दिला तो योग्यच आहे. पण सरकारने ज्या प्रकारे नियोजन केलं आणि जे कंत्राट दिलं ती व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या जवळची होती का? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच या दुर्घटनेतील मृतांची संख्या का लपवली जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.


























































