देशात राजकीय स्वातंत्र्य व लोकशाही जिवंत आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्प तसेच देशातील तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवरून राज्य सरकार व केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

”आम्ही ‘इंसाफ के शिपाई’ म्हणून लढत आहोत. देशात राजकीय स्वातंत्र्य व लोकशाही जिवंत आहे का? हा विषय व विचार देशभरात मोठा होतोय. 2024 ची निवडणूक जर लोकशाही साठी घातक ठरली तर ही निवडणूक देशातील शेवटची निवडणूक होईल असं सर्वांना वाटतंय” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

”गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे व इतर काही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना एजन्सीविरोधात पत्र लिहलं आहे. ज्यांच्यावर आरोप झाले ते पळाले, ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या फाईल्स बाजूला ठेवल्या गेलेल्या आहेत. जे आमच्यासोबत आहेत त्यांच्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. असं राज्य चालू नाही शकत. त्यामुळे देशातील लोकशाही टिकते की नाही इथपर्यंत विषय पोहोचलेला आहे. सरकारच्या मनात भीती आहे. जर कुणी खऱ्यासोबत किंवा सरकारच्या विरोधात उभं राहिलं तर तर त्यांच्यावर कारवाई केली जातेय. आता देशभरात हा पॅटर्न तयार झालेला आहे. हे फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर लोकशाहीसाठी घातक आहे. ”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

”घटनाबाह्य सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. याच सरकारमधी एका मंत्र्याने महिला खासदाराला शिवीगाळ केली आहे. एका आमदाराने पोलीस स्टेशनच्या इथे गोळीबार केलाय तरी त्यांना अद्याप अटक झालेली नाही. आर्म्स अॅक्टमध्ये गुन्हा दाखल झालाय. मात्र अटक झालेली नाही” असं आदित्य ठाकरे म्हणाले.