स्थानिकांची बाजू ऐकूनच गेट वे जवळील जेट्टीचा निर्णय घ्या! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब या भागात प्रस्तावित जेट्टीच्या काँक्रिट बांधकामामुळे ऐतिहासिक वारशाचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्या, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

अलीकडेच माझी कुलाबा परिसरातील रहिवाशांची भेट झाली. तेव्हा गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब यामधल्या भागात होणाऱ्या प्रस्तावित जेट्टीबाबत रहिवाशांनी त्यांच्या चिंता मला बोलून दाखवल्या. या प्रस्तावित जेट्टीबाबत स्थानिकांशी कोणतीही सल्लामसलत न करता, त्यांना विश्वासात न घेता काँक्रिटचे विद्रुप बांधकाम तिथे केले जाणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसराचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. असे घडण्याआधी आपण कृपया इथल्या स्थानिक रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे  आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले.