विक्रांत बचाव घोटाळा – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खजिनदाराला सहआरोपी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ बचाव मोहिमेच्या नावाखाली जमा केलेला कोटय़वधी रुपयांचा निधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाला दिल्याचे समोर येत आहे. ‘विक्रांत’च्या बचावासाठीचा पैसा पक्षाला देणे हा जनतेचा विश्वासघात आहे. याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, खजिनदार आणि अकाऊंट ऑपरेटरला सहआरोपी करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे  केली आहे.

‘विक्रांत’ युद्धनौका वाचवण्यासाठी सुरू केलेल्या बचाव मोहिमेतून जमा होणारा सर्व निधी राज्यपालांकडे जमा करणार असल्याचे आश्वासन किरीट सोमय्या यांनी दिले होते. त्यामुळे हजारो नागरिकांनी देशप्रेमापोटी या मोहिमेत सहभागी होत आर्थिक मदत केली होती. त्यामुळे जमा झालेला निधी तत्कालीन राज्यपालांकडे जमा करणे अपेक्षित होते. मात्र सोमय्यांनी तसे न करता सदरचा निधी भाजपला दिल्याची माहिती समोर येत आहे. हा एक प्रकारचा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत त्या खात्याची चौकशी पूर्ण होईपर्यंते गोठवण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली आहे.

सोमय्यांविरोधात राष्ट्रवादीचे  भाजप कार्यालयासमोर आंदोलन

विक्रांत वाचवा निधीच्या अपहाराप्रकरणी उच्च न्यायालयाने केलेल्या सुनाणीनंतर नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरिट सोमय्या मुंबईत परतल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. ‘सोमय्या हाय हाय’, ‘मोदी सरकार चोर है’ अशा घोषणा देत सोमय्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही सहभागी महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. किरिट सोमय्यांच्या अटकेची मागणी करीत भाजपच्या मरीन लाइन्स येथील कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धडकले. यावेळी त्यांनी वाढती महगाई, सीएनजी, पीएनजीच्या किमतवाढीविरोधातही जोरदार घोषणा दिल्या.