‘ठग्ज’ने ठगवले, आमिरने मागितली प्रेक्षकांची माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aamir-khan-thugs-of-hindost

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान आणि शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट पुरता फ्लॉप झाला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बिग बी एकत्र काम करणार म्हणून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती, परंतु चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा हिरमोड झाला. आता आमिरने देखील खुलेआम आपण प्रेक्षकांचे हवे तसे मनोरंजन करू शकलो नाही हे मान्य करत त्यांची माफी मागितली आहे.

‘आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खानने प्रेक्षकांची माफी मागितली. तो म्हणाला, ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. याची संपूर्ण जबाबदारी माझी असून आमच्याकडून काही चुका झाल्या, याची जबाबदारी मी घेतोय. आम्ही संपूर्णपणे प्रयत्न केला, परंतु कुठे न कुठे काहीतरी चूक झाली. काही लोकांना चित्रपट आवडलाही परंतु अशांची संख्या कमी आहे. जे लोक हा चित्रपट पाहण्यासाठी आले त्यांची मी माफी मागतो. मी या वेळी त्यांचे जास्त मनोरंजन करू शकलो नाही, परंतु माझ्याकडून मी प्रयत्न केला. जे लोक अधिक अपेक्षेने हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटत आहे.’

दरम्यान, आमिरचा हा फ्लॉप ‘ठग्ज’ चीनमध्ये डिसेंबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे. या ठिकाणी आमिरचा मोठा चाहता वर्ग आहे. तेथे हा चित्रपट किती कमाई करतो यावर सर्वांची नजर असेल.