‘हीच मोदींची गॅरंटी आहे का?’; आपचा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा

आम आदमी पार्टीने (आप) रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक समस्या हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप ‘आप’ने केला आहे.

‘आप’ने आपल्या ‘X’ हँडलवर एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अमेरिका, चीन, मणिपूर, लडाख, उत्तराखंड आणि आसाममधील समस्यांचा उल्लेख आहे. अमेरिकेसोबतचा टॅरिफ वाद, मणिपूरमधील वांशिक संघर्ष आणि चीनच्या घुसखोरीचा आरोप यांसारख्या मुद्द्यांवरून ‘आप’ने ‘ना देशाच्या सीमा मोदींच्या हातात सुरक्षित आहेत, ना देशाचा सन्मान,’ असे म्हटले आहे. ‘हीच मोदींची गॅरंटी आहे का?’ असा सवालही ‘आप’ने विचारला आहे.

या ग्राफिक्समध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, मोदी सरकार अमेरिका, चीन, लडाख, मणिपूर, उत्तराखंड आणि आसाममधील परिस्थिती हाताळण्यास ‘अक्षम’ आहे.

‘आप’ने हे आरोप देशात आणि परदेशात घडलेल्या काही ताज्या घटनांवरून केले आहेत. आपने हिंदुस्थान-अमेरिका संबंधांमधील तणावावर जोर दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वस्तूंवर लावलेले मोठे कर आणि रशियासोबतच्या तेल व्यापारावर लावलेले दंड यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम झाला आहे.

देशांतर्गत मुद्द्यांवर ‘आप’ने मणिपूरमधील स्थितीचा उल्लेख केला. अडीच वर्षांपूर्वी वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून तिथे तणाव कायम आहे आणि राज्याला अजूनही निवडून आलेले सरकार मिळालेले नाही.

याशिवाय, ‘आप’ने हिंदुस्थान-चीन सीमेवर चिनी वस्त्या असल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोपही अधोरेखित केला. पोस्टरमध्ये लडाखमधील अलीकडील हिंसक संघर्षाचाही उल्लेख आहे, जिथे राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी हिंसक रूप धारण केले होते.

‘आप’ने इतर देशांतर्गत मुद्द्यांवरही टीका केली आहे. यामध्ये उत्तराखंडमध्ये भरती परीक्षेतील गैरव्यवहारांविरोधात झालेले मोठे सरकारविरोधी आंदोलन आणि आसाममध्ये कोच-राजबोंगशी समुदायाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा देण्याच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक आंदोलनांचा समावेश आहे.

आपची सोशल मीडिया पोस्ट

AAP X post

‘आप’च्या मते, या सर्व घटना केंद्र सरकारचे कुप्रशासन आणि देशासमोरील गंभीर समस्या सोडवण्यात आलेले अपयश दर्शवतात.