मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे इन ऍक्शन! आरे मेट्रो कारशेड बांधकामाला स्थगिती

496

आरे कारशेडच्या कामाला मी आज स्थगिती दिलेली आहे. आरेत सुरू असलेली झाडांची कत्तल मला चालणार नाही. कोणत्याच विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. पण जर का आपल्या हातातलं वैभव गमावून काही कमावत असू तर तो विकास होऊ शकत नाही. जोपर्यंत याचा पुनर्विचार करून पुढची दिशा ठरत नाही तोपर्यंत आरेमधलं एक झाड काय एक पानसुद्धा तोडता येणार नाही, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सचिवांच्या बैठकीत दिले. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथेनुसार मंत्रालयातील पत्रकार कक्षाला भेट दिली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाकडून झालेले स्वागत आणि सत्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. आरे कारशेडबाबत झालेला निर्णय सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, विधानसभा निवडणुकी वेळी जे विषय गरम झाला होता त्या आरे कारशेडच्या कामाला मी आज स्थगिती दिलेली आहे आणि त्याचा पूर्णपणे रिह्यू घेतल्याशिवाय हे काम होणार नाही. आजसुद्धा बातमी आली की, रात्री झाडे तोडली. ही कत्तल मला चालणार नाही. मी या कामाचं पूनर्परीक्षण करीन आणि जे काही गरजेचं असेल ते करेन. विकास हा होणार, मी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली नाही.

मुख्यमंत्री म्हणून मी न सांगता आलो आहे. मी आधी काही जाहीर केलेलं नव्हतं. अनपेक्षितपणे आलो आहे. आपण जे काही ठाकरे कुटुंबाला ओळखता त्यानुसार स्वतःसाठी आम्ही कधीच काही प्रयत्न केलेले नाहीत. ही जबाबदारी आली आणि जबाबदारी टाकून जर पळालो असतो तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून नाव सांगायला नालायक ठरलो असतो. हे मोठं आव्हान आहे हे मला माहीत आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. राज्यासमोर महागाई, टंचाई, भ्रष्टाचार या सगळ्यांचा सामना आम्हाला करायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पारदर्शकतेसोबतच पारदर्शकता हवी
मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला पारदर्शकता या शब्दाची देणगी मिळाली आहे. तिचा उपयोग करून पारदर्शकतेने किंबहुना फारदर्शकतेने दूरचंही बघून काम करायचं आहे. पत्रकारांनी सरकारचे एक घटक म्हणून काम करायचे आहे. नुसतं कोंडीत पकडण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी तुम्ही हवे आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडं रुळायला लागेल
उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रत्यक्ष विधानसभेत जे सभागृह असतं तेही मी अजून बघितलेलं नाही. तरीदेखील हे शिवधनुष्य मी उचललेलं आहे. मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत केवळ दोन-तीन वेळा मंत्रालयात आलो आहे. अजूनही मला वाटतं की, निवेदनच घेऊन आलो आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटून ते द्यायचं आहे. तुम्ही जेव्हा म्हणताय की, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत… त्या वेळीही मी आजूबाजूला बघतोय ते कुठे गेले… थोडं रुळायला लागेल, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

पत्रकारांनी सरकारचे कान, नाक, डोळे व्हावे
ठाकरे घराणे आणि पत्रकारांचे ऋणानुबंध आहेत. हे ऋणानुबंध आता आणखी घट्ट झालेले आहेत. पत्रकार म्हटलं की नुसतं धर की ठोक या गोष्टीला काही अर्थ नसतो. माझे आजोबा मला नेहमी सांगायचे टीका करताना अशी केली गेली पाहिजे की ज्याच्यावर टीका करतोय त्याला त्याच्या चुका कळायला हव्यात आणि सुधारणाही करता आल्या पाहिजेत. नुसतं ओरबाडणं म्हणजे पत्रकारिता नाही. आपणसुद्धा सरकारचे नाक कान डोळे झाले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी होते की नाही बघा
मागील पाच वर्षांत आम्ही सत्तेत होतो की नव्हतो ही भूमिका कुणालाच कळली नव्हती. ती भूमिका हीच होती की सरकार घोषणा करते. सरकार पुढे जात राहते; पण घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे कोणी बघत नाही. पत्रकारांनी तो कानोसा घ्यायचाय. एखादी गोष्ट केल्यानंतर कोणत्या जिह्यात अंमलबजावणी झाली किंवा कोणत्या जिह्यात अंमलबजावणी झाली नाही. त्यात काय अडथळे आहेत ते पहावेत. केवळ मंत्रालय पत्रकार कक्ष म्हणून नाही तर या कक्षात आपण दक्ष असलं पाहिजे आणि राज्यभर आपलं लक्ष असले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हा रंग कितीही धुतला तरी जाणार नाही
उद्धव ठाकरे यांना सदऱ्याच्या रंगावर (भगवा) प्रेम आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, हा रंग माझ्या जन्मापासून माझ्या सोबत आहे. तो माझा सर्वात आवडता रंग आहे. कोणत्याही लाँड्रीत तो धुतला जाणार नाही आणि तो जन्मभर सोबत राहणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्षावर जाणार की नाही, असा प्रश्न केला असता त्यांनी जाऊ की नको, असा प्रतिसवाल करताच पत्रकारांमध्ये हंशा पिकला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझं आणि मातोश्रीचं एक अतूट नातं आहे. पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिथे जाणं गरजेचं असेल तेव्हा तिथे जाणार आणि जे आवश्यक आहे ते करणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कारशेडच्या निर्णयावर फडणवीस नाराज
आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15,000 कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतकणूवदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, अशी भीती त्यांनी ट्वीट करत व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या