आम्ही खुनी, दरोडेखोर, चोर नाही! ‘आरे’ बचाव आंदोलकांनी सांगितली ‘दडपशाही’ची कहाणी

635

केंद्र-राज्य सरकार पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवत असते. आम्हीदेखील मुंबईकरांचे फुप्फुस असलेले  ‘आरे’ जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे आम्ही खुनी, दरोडेखोर, चोर नाही. त्यामुळे आमच्यावर ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्याचे 353 कलम कसे लावता, असा सवाल करीत ‘आरे’ बचाव आंदोलकांनी आपल्यावरील गुन्हे ताबडतोब रद्द करा अशी गुरुवारी जोरदार मागणी केली. यावेळी पोलीस-प्रशासनाने केलेल्या दडपशाहीची कहाणीदेखील त्यांनी सांगितली.

‘आरे’ बचाव आंदोलनात अटक केलेल्या 29 पर्यावरणप्रेमींनी सुटका झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर ‘एमएमआरसीएल’ने 4 ऑक्टोबर रोजी रातोरात शेकडो झाडांची कत्तल सुरू केली. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच शेकडो मुंबईकर, पर्यावरणप्रेमींनी ‘आरे’त धाव घेऊन घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावरील पोलिसांनी आंदोलकांना ‘आरे’त जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी, पर्यावरण गीत गायन सुरू केले. हे सर्व शांततेच्या मार्गाने सुरू असताना पोलिसांनी आपल्यावर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आरे कारशेड, नाणारला शिवसेनेचा विरोध कायम! उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

महिला, तरुण-तरुणींना अक्षरशः या ठिकाणाहून फरफटत नेल्याचे त्यांनी सांगितले. रात्री झाडे तोडण्याच्या परवानगीचे पत्र आहे का असे विचारले असता उडावाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचेही आंदोलक म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी असताना शेकडो झाडे रातोरात कापण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यावेळी प्रमिला भोईल, कपिल, स्वप्ना स्वार, श्रुती नायर, शशिकांत सोनावणे, संदीप परब, मनन देसाई, सिद्धार्थ अनुभवणे आदींनी आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

‘ईव्हीएम’सोबत ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवा!
लोकशाही मार्गाने पर्यावरणाच्या बचावासाठी हे आंदोलन केले असता आम्हाला अटक करण्यात आली. ठाणे मध्यवर्ती कारागृहात भयंकर गुह्यात शिक्षा झालेल्या गुन्हेगारांबरोबर ठेवण्यात आले. ही लोकशाहीची हत्याच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आपल्या ‘आरे बचाव’ मोहिमेसाठी सर्व मुंबईकर जनतेचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ‘ईव्हीएम’ मशीनसोबत ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवावे, जेणेकरून जनतेची खरी भावना सरकारला कळेल असे आव्हानच आंदोलकांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या