हिंदुस्थानच्या यंग ब्रिगेडचा विस्फोटक अंदाज; वैभव-एरॉन जॉर्जची शतकीय खेळी, दक्षिण आफ्रिकेच्या बत्त्या गूल

हिंदुस्थानची यंग ब्रिगेड सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 19 वर्षांखालील टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. टीम इंडियाचे धडाकेबाज सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी विस्फोटक अंदाजात शतक ठोकलं आणि पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावा चोपून काढल्या.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. याचा टीम इंडियाच्या धुरंधर फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला आणि दोघेही गोलंदाजांवर तुटून पडले. एरॉन जॉर्जने 106 चेंडूंमध्ये 16 चौकारांच्या मदतीने 118 धावांची खेळी केली. तर त्याच्या जोडीला आलेल्या आणि सध्या तुफान फॉर्मात असणाऱ्या वैभव सूर्यवंशीने 74 चेंडूंमध्ये 9 चौकार 10 गगनचुंबी षटकारांच्या जोरावर 127 धावा चोपून काढल्या. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 393 धावा केल्या आणि 394 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला दिले.

प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांच्या पायात अचून बेड्या ठोकल्या आहेत. 50 धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे पाच फलंदाज आल्यापावली माघारी परतले आहेत. चारपैकी एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा घाटता आला नाही. किशन कुमार सिंगने तीन विकेट घेतल्या तर पटेलने 1 विकेट घेतली. सध्या खेळ सुरू असून 11 षटकांचा खेळा झाला असून दक्षिण आफ्रिकेने 5 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा केल्या आहेत.