
यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरी आणि कर्णधार हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पह्टक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात केवळ अहंकार दिसून येतो. तो धोनीप्रमाणे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतो, मात्र अनेकवेळा ते त्याला शक्य होत नाही, अशा शब्दांत डिव्हिलियर्सने हार्दिक पंडय़ाचे कान उपटले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या संघमालकांनी रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत ती जबाबदारी हार्दिकच्या खांद्यावर सोपवली. त्यानंतर मुंबईचे संघ मालक आणि हार्दिकवर टीकेची झोड उठली होती. त्यात आता हार्दिकच्या नेतृत्वामध्ये मुंबईला सर्वप्रथम प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची नामुष्की सोसावी लागल्याने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एका यूटय़ूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये डिव्हिलियर्स भरभरून बोलला. तो म्हणाला, हार्दिकची नेतृत्व शैली खूप धाडसी आहे. त्यात अहंकार भरलेला वाटतो. त्याची शैली काहीशी धोनीसारखी आहे. पण जेव्हा तुम्ही अनेक अनुभवी खेळाडूंसह खेळत असता तेव्हा तुमची ही शैली नेहमीच त्यांना पटेल असे होत नाही. गुजरातमध्ये असताना हार्दिकची ही शैली फायदेशीर ठरली. कारण गुजरातच्या संघात सर्व नवोदित खेळाडू होते, मात्र अनुभवी खेळाडूंच्या संघामध्ये ही काम करेलच असे नाही. त्याचाच दुष्परिणाम मुंबईवर झाल्याचे डिव्हिलियर्स म्हणाला.



























































