
मी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली त्याची माहिती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. ही पुडी हितचिंतकानेच सोडली, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
अब्दुल सत्तार यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य फुटले नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फुटले. त्यांच्याशी समन्वय ठेवला असता तर पराभव झाला नसता. मला दिलेल्या खात्यावर मी समाधानी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी मी पार पाडणार असेही त्यांनी सांगितले.






























































