
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संरक्षण दलातील हा महत्त्वाचा पुरस्कार आहे. 27 फेबुवारीला हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावताना आकाशात जो संघर्ष झाला त्यामध्ये वर्धमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ- 16 फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ने सन्मान होणार असल्याचे समजते. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा सरकारमार्फत करण्यात आलेली नाही.
वर्धमान यांची कामगिरी
हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना आकाशात हिंदुस्थानी हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाची विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 फायटर विमानावर आर- 73 मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले ऍमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग 21 बायसन विमानाला धडकले. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-21 पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. हिंदुस्थानने सर्व बाजूंनी पाकिस्तानकर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना मायदेशी पाठवले.




























































