
मोक्कानुसार कारवाई केल्यानंतर जामिन मिळविण्यासाठी न्यायालयात बनावट वैद्यकीय कागदपत्रे सादर करणाNया फरारी सराईत निलेश बसवंत याला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशीच आरोपीच्या मुस्क्या आवळल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
कोंढवा पोलिसांनी कुख्यात बापू नायर टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यामध्ये निलेश बसवंत, अमोल बसवंत, दीपक कदम, दत्ता माने यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. निलेश बसवंतला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात होता. ऑक्टोंबर २०१६ मध्ये त्याने आजापरपणाचे कारण सांगून तशी बनावट कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यामध्ये सातारा येथील डॉ. अंदुरे यांचे ऑनेको लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या नावाने प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत शंका आल्यानंतर पुणे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून केला जात होता. त्यावेळी फरारी सराईत नीलेश बसवंत हा खेड शिवापूर येथील दग्र्याजवळ कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे आणि पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या पथकाने सापळा रचून बसवंतला अटक केली. तो नायर टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्याच्यावर खंडणी, मारामारी, खून असे १२ गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय थोरात, योगेश जगताप, इम्रान शेख, तुषार माळवदकर, अय्याज दड्डीकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.
सेवानिवृत्तीच्या दिवशी धमाकेदार कामगिरी
गुन्हे शाखेच्या युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले बुधवारी सेवानिवृत्त झाले. तत्पुर्वी त्यांनी फरारी सराईत आरोपी कुख्यात नीलेश बसवंतला बेड्या घातल्या. याप्रकरणी त्यांच्या कामगिरीचे पोलीस दलात कौतुक केले जात आहे.

























































