
पालिकेच्या प्रमुख मोठय़ा तीन रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये आता खास एसी बर्न वॉर्ड सुरू केला जाणार आहे. याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवसेना नगरसेविका आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी वातानुकूलित विभाग सुरू करण्याची मागणी केली होती.
मुंबईत गेल्या काही वर्षांत आगीच्या दुर्घटना वाढल्या आहेत. यामध्ये जखमी होणाऱया दुर्घटनाग्रस्तांवर अनेक वेळा पालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्येही उपचार केले जातात. आगीच्या दुर्घटनेत रुग्णाची त्वचा निघत असल्याने वेगाने इन्फेक्शन वाढून मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. त्यामुळे आरोग्य सेवेवर तीन हजार रुपयांचे बजेट तयार करून खर्च करणाऱया पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत असा विशेष बर्न वॉर्ड नसल्याने गैरसोय होत असल्याचा मुद्दा राजुल पटेल यांनी उपस्थित करून तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली होती.
पालिका आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद
नगरसेविका राजुल पटेल यांनी मांडलेली सूचना स्तुत्य असल्याचे पालिका आयुक्तांनी प्रस्तावावरील आपल्या अभिप्रायात स्पष्ट केले आहे. प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये साधारणतः 30 टक्क्यांपर्यंत भाजलेल्या रुग्णांवर आंतररुग्ण म्हणून उपचार केले जातात. जर रुग्ण यापेक्षा जास्त भाजला असेल तर त्यावर गरजेनुसार आवश्यक उपचार केले जातात. या पार्श्वभूमीवर नगरसेविका राजुल पटेल यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये भाजलेल्या रुग्णांसाठी वातानुकूलित विभाग तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.





























































