प्रतीक्षा संपली; एसी डबलडेकर आली! पुढील आठवडाभरात इलेक्ट्रिक बस ताफ्यात येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी मुंबईची शान असणारी डबलडेकर ‘बेस्ट’ नव्या वातानुकूलित आणि नव्या अद्ययावत स्वरूपात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. पुढील आठवडय़ात ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होत असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सामील झाली असून आरटीओचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर ही बस रस्त्यावर धावणार आहे.

मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱया उपक्रमांतर्गत ‘बेस्ट’च्या ताफ्यात 54 आसन क्षमता असलेल्या 900 डबलडेकर बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. डबलडेकर बसेस मुंबईची शान असून सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 45 डबलडेकर बसेस आहेत. मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन 900 वातानुकूलित डबलडेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. अशोक लेलँड कंपनीच्या या बसेस आहेत. लंडनमधील डबलडेकर बसच्या धर्तीवर या बसेस आहेत. इलेक्ट्रिक बस या पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जातो. त्या धाटणीत तयार केलेली पहिली वहिली इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बस बेस्टच्या ताफ्यात सामील झाली आहे.

सीसीटीव्ही, दोन प्रवेशद्वार!
डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळणार आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे.