
सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई
टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अंबाजोगाई येथे नियुक्त असलेले कर्मचारी भुजंग गुरनाळे (२७) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात रविवारी दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील मलकवाडी – उजनी रस्त्यावर झाला.
भुजंग गुरनाळे हे महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचारी आहेत. सहा महिन्यापूर्वीच त्यांची अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली होती. रविवारी दुपारी ते गावाकडून पत्नीसह दुचाकीवरून अंबाजोगाईकडे कामावर जाण्यासाठी निघाले होते. ते मलकवाडी – उजनी दरम्यान रस्त्यावर आले असताना त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील गुत्तेदाराच्या टिपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टिपरच्या खाली येऊन भुजंग गुरनाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी शारदा या गंभीर जखमी झाल्या. शारदा यांना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.






























































