चंद्रपूरमध्ये आठवडी बाजारात कार घुसली; एकाचा मृत्यू, चारजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात सावली येथील आठवडी बाजारात कार घुसल्याने एकाचा मृत्यू झाला,तर चार जण जखमी झाल्याचा विचित्र अपघात गुरुवारी घडला आहे. सावली येथील आठवडी बाजारात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मार्कंडी मोहूर्ले यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

या अपघातात दशरथ कावरु आणि सोमेश्वर मोहूर्ले हे गंभीर जखमी झाले आहेत. तर कांताबाई कन्नाके आणि छायाबाई काळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी मारुती कार सिंदोळा मार्गावरून सावलीकडे येत होती. सावली येथे आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर गर्दी होती. कार भरधाव वेगाने असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने बाजारातील फळांच्या रिक्षाला धडक देत पाच नागरिकांना धडक दिली.