
नगरमध्ये लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून खासदार सुजय विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दोघे उघडपणे, पण नाव न घेता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. तसेच नगर जिह्यात ठिकठिकाणी विखे यांना पक्षांतर्गत होणारा विरोध, आमदार राम शिंदे आणि आमदार लंके यांच्यामध्ये असलेली जवळीक पाहता, महायुतीतच आलबेल नसल्याचे चित्र आहे. आता एकमेकांवर होणारे आरोप पाहता, महायुतीमध्येच जुंपल्याचे दिसून येत आहे.
राहायला पत्र्याचे घर आणि फिरतात फॉर्च्यनरमध्ये!
‘राजकारणात सध्या काही नाटकी पुढारी नको ते आर्विभाव करतात. समाजाची दिशाभूल करून साधेपणाचा आव आणतात. राहायला पत्र्याचे घर दाखवितात. मात्र, आलिशान फॉर्च्युनर वाहनात फिरतात,’ अशी टीका खासदार सुजय विखे यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली.
भाजपचे ‘गाव चलो’ अभियान सध्या सुरू आहे. भाजपच्या अभियानाअंतर्गत खासदार विखे यांनी वाळकी (ता. नगर) येथील कार्यकर्त्यांशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार लंके यांच्यावर हल्लाबोल केला.
देश, तसेच राज्यस्तरावरील विकासाचा ऊहापोह करीत खासदार विखे यांनी राजकारणातील ढोंगी साधेपणाच्या प्रवृत्तीवर टीका केली. ते म्हणाले, ‘राजकारणातील काहीजण साधेपणाचा आव आणतात. मी सर्वसामान्य आहे, मी साधा आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तेच सर्वकाही करतात. वाळूमाफियांचा उद्योग त्यांच्याकडूनच केला जात आहे. अधिकाऱयांना वेठीस तेच धरतात. चुकीची कामे तेच करतात. विकासाच्या प्रत्येक कामात ‘टक्केवारी’ घेतली जाते. राहायला पत्र्याचे घर असल्याचे सांगतात. मात्र, फॉर्च्युनर या आलिशान वाहनात फिरतात. हे कसले त्यांचे साधेपण?’ असा सवाल खासदार विखे यांनी लंके यांचे नाव न घेता केला.
‘मी इतरांसारखा साधेपणाचा आव कधीही आणत नाही. होणाऱया कामास हो म्हणतो अन् न होणाऱया कामास नाही म्हणतो. ही माझी पद्धत आहे. मात्र, ते न होणाऱया कामास हो म्हणून समाजाची दिशाभूल करतात,’ असा हल्लाबोलही विखे यांनी केला.
साकळाई योजना मार्गी लागल्यास ते राजकीय संन्यास घेणार का?
– ‘नगर व श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरणारी बहुचर्चित साकळाई योजना आपण कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लावणारच,’ असा विश्वास व्यक्त करीत, ‘योजना मार्गी लागल्यास ‘ते’ राजकीय संन्यास घेणार का?’ असा सवाल खासदार विखे यांनी आमदार लंके यांना केला.
काहीजण संस्थेतील कामगारांचे पैसे कापून यंत्रणा राबवितात!
‘नगरमधील काहीजण ‘आमची यंत्रणा’ आहे, असे सांगत कामाला लागले आहेत. यांची कसली यंत्रणा? ते त्यांच्या संस्थेत पगाराने काम करणाऱयांचे पैसे कापून यंत्रणा राबवितात,’ असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी खासदार विखे यांचे नाव न घेता केला. दरम्यान, ‘माझ्याकडे साधे व स्वच्छ कार्यकर्ते आहेत व त्यांच्या जीवावर मी राजकारण व समाजकारण करीत आहे,’ असे लंके यांनी सांगितले.
आमदार नीलेश लंके यांचा मुंबई येथे कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी खासदार विखेंवर टीका केली. आमदार लंके म्हणाले, ‘मी अत्यंत साधा माणूस आहे. जनता हेच माझे दैवत आहे. जनतेसाठी मी अहोरात्र काम करतो,’ असे सांगत, ‘मुंबईकरांनी मला चांगली साथ दिली आहे,’ असे असे म्हणत त्यांनी जनतेचे कौतुक केले. याच वेळेला भाषणामध्ये त्यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
























































