
झारखंडमध्ये बसून देशातील अनेकांची विविध माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणारा भामटा गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. विकास मंडल (28) असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात 39 गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखा युनिट-4 चे पथक एका ऑनलाईन फसवणुकीच्या गुह्याचा तपास करीत होते. झारखंड, राजस्थान व पश्चिम बंगाल येथील संशयितांची माहिती काढत असताना दोन मोबाईल नंबरधारक व्हिवास्ट्रिट या वेबसाईटवर कॉलगर्ल पुरविण्यात येत असल्याचे भासवून इच्छुकांकडून आगाऊ रक्कम घेऊन फसवणूक करीत होते. तसेच संबंधितांनी कॉल केल्यास त्यांचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत होते. अशा प्रकारे सेक्सटॉर्शन करणारा झारखंडचा विकास मंडल हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईत आला असून तो तेथील साईपूजा हॉटेलात थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक इंद्रजित मोरे, सपोनि अजय बिराजदार तसेच राजू सावंत, शरद शिंदे, ज्ञानेश्वर मिंडे, अनुपम जगताप आदींच्या पथकाने त्या हॉटेलात धडक देऊन विकास मंडल याला पकडले.
























































