वांद्रय़ाच्या चिल्ड्रन थिएटरमध्ये अभिनयाचे धडे, पालिकेने मागवल्या संस्थांकडून निविदा

मुंबईत लहान मुलांसाठी आता अभिनयाचे धडे पालिकेमुळे मिळणार आहेत. यासाठी पालिका वांद्रे येथील कार्टर रोडवरील शेरली राजन गावात ‘चिल्ड्रन्स थिएटर’ सुरू करणार आहे. यासाठी आरक्षित इमारतीत अभिनयाचे धडे देण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱया संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी लहान मुलांना चित्रपटाचे प्रशिक्षण, चित्रपट दाखवणे, मास्टर क्लासेस असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामुळे लहान मुलांसाठी बालरंगभूमीच तयार होणार आहे.

मुंबईतील प्रतिभावंत लहान मुलांसाठी अभिनयाचे धडे घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना हा खर्च करणे शक्य होत नाही. परिणामी त्यांची कला समोर येत नाही. त्यामुळे बालरंगभूमीसाठी स्वतंत्र नाटय़गृह असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी संस्थांच्या माध्यमातून थिएटर सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे बालकलाकार होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.

अशी होणार संस्थेची निवड

कार्टर रोडवरील शेरली राजन गावात नगर भूमापन क्रमांक 1166 ते 1169 आणि 1179 वर ’चिल्ड्रन थिएटर’करिता आरक्षित भूखंडावर पालिकेने 712.63 चौरस मीटर जागेत नाटय़गृह उभारले आहे. हे नाटय़गृह चालविण्यासाठी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

ही उलाढाल आर्थिक वर्षांच्या प्रस्तावित खर्चाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी नसावी. मागील तीन वर्षांच्या कालावधीकरिता सनदी लेखापालांनी प्रमाणित केलेला ताळेबंद अर्जासोबत सादर करावा लागेल. संस्थेच्या नावे स्वतंत्र पॅन क्रमांक असावा यासह विविध अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत.

शिवाय अर्ज करणारी संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्था नोंदणी अधिनियम तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 या दोन्ही अधिनियमानुसार मागील 5 वर्षांपासून अथवा कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत असावी. संस्थेची मागील तीन वर्षांच्या कालावधीतील किमान वार्षिक उलाढाल दहा लाख रुपये असावी.