आदित्य ठाकरेंनी दिला महिलांना न्याय, वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर 24 तासात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या निमित्ताने आलेल्या शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना भेटून महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यथा व अडचणी मांडल्या होत्या. तसेच कळमनुरी येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्याविरुध्द तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणाची दखल घेण्याची सूचना केली. त्यानुसार आरोग्य संचालकांनी वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला असून, तसे लेखी फर्मान रविवारी सायंकाळी हिंगोलीत धडकले.

‘जन आशीर्वाद यात्रे’च्या निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली येथे दौऱ्यावर आले होते. आदित्य ठाकरे यांच्यासह वाहनांचा ताफा जात असताना रस्त्यावर महिला उभ्या असल्याचे व त्यांच्या हातात निवेदन असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पाहिले व वाहन थांबवून या महिलांसोबत चर्चा केली. महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा टाक तिताळकर यांनी व अन्य महिला कर्मचाऱ्यांनी डॉ.सूर्यकांत लोणीकर या वरिष्ठांकडून होत असलेला त्रास आदित्य ठाकरे यांना सांगितला. अडचण सांगताना डॉ.सुषमा टाक यांना रडू आले. त्यावेळी युवासेनाप्रमुखांनी त्यांची समजूत काढून शांत केले. आदित्य ठाकरे यांनी सोबत असलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणाच्या चौकशीची सूचना करुन लोणीकरवर कारवाई करा, असे सांगितले. त्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत सूत्रे हलली असून डॉ.लोणीकर यांची चौकशी सुरू करुन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी जारी केले आहेत. आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार हे आदेश काढल्याचे पत्रात नमुद केले आहे. कळमनुरी येथील अ‍ॅड.विश्वास चौधरी यांच्यासह नागरिकांनी यापूर्वी डॉ.लोणीकर यांच्या कारभाराविरुध्द उपोषण देखील केले होते. आदित्य ठाकरे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे महिला व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.