लातुरात फॅन्सी नंबर प्लेट बसवलेल्या वाहनांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील कांही दिवसांपासून लातूर शहरात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर बनवलेल्या फॅन्सी नंबर प्लेट पोलिसांच्या रडारवर आलेल्या आहेत. शहरातील अशा वाहनांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केलेली आहे.

लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दुचाकी वाहनधारकांवर सध्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बुलेटधारकांनी आपल्या वाहनांचे सायलेन्सर बदलून घेतलेले होते. वेगवेगळे आवाज करणारे हे सायलेन्सर पोलिसांनी जप्त करून कारवाई केलेली होती. त्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बसवलेल्या आहेत, अशी वाहने शोधून पोलीस कारवाई करीत आहेत.

लातूर शहरात फॅन्सी नंबरप्लेट वापरणार्‍या वाहनधारकांची संख्या भरपूर आहे तसेच अनेकजण वाहनांवर नंबर प्लेटच वापरत नाहीत तर पोलीस, पत्रकार, काका, नाना, दादा, राम, साहेब अशी अनेक प्रकारची नावे टाकलेली दिसत आहेत, तर काही जणांनी राजकीय पक्षांची नावे, पक्षांचे चिन्ह टाकलेले आहे. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.