घोड नदीतील वाळूमाफियांना दणका, 28 बोटी डिझेल टाकून पेटविल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावरे

शिरूर तालुक्यातील पिंपळाचीवाडी व शिंदोडी गावच्या हद्दीतील घोड नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या 28 बोटी नष्ट करण्यात आल्या. शिरूर महसूल विभाग व पोलीस पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. तालुक्यातील आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असून, यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील पिंपळाची वाडी व शिंदोडी हद्दीतील घोड नदीच्या पात्रात रात्रंदिवस बेकायदेशीरपणे वाळूउपसा सुरू होता. त्यामुळे शासनाचा सुमारे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला होता. त्यामुळे या परिसरात होणाऱ्या अवैध वाळूउपशावर कारवाई व्हावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थ करत होते.

या पाश्र्वभूमीवर शिरूर महसूल विभाग व पोलीस पथकाने संयुक्तरीत्या मोहीम आखून आज वाळूउपसा केल्या जाणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये अवैध वाळूउपसा करणाऱ्या 28 बोटी आढळून आल्या. पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी आल्याचे पाहताच वाळूमाफिया पसार झाले. दरम्यान, पथकाने वाळूउपसा करणाऱ्या सर्व बोटी जप्त करून त्या नष्ट केल्या.

शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, पोलीस उपनिरीक्षक इनामदार, मंडल अधिकारी गोसावी, मंडल अधिकारी नीलेश घोडके, तलाठी प्रशांत शेटे, प्रमोद लोखंडे, बेंडभर, पोलीस नाईक जाधव, ओहोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.