येरवड्यातील सराईतावर स्थानबद्धतेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येरवडा परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीला संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

निहाल विशाल भाट (23, रा. येरवडा) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरात धुडघूस घालणाऱ्या आतापर्यंत 72 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून या सर्व गुन्हेगारांची जेलमध्ये रवानगी केली आहे. भाट याच्यावर करण्यात आलेली ही 73वी कारवाई आहे. निहाल पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गेल्या पाच वर्षात भाट याच्यावर 3 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच, त्याच्यापासून जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला होता.  त्याच्याविरोधात उघड तक्रार करण्यास नागरिक भीत होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे यांनी केली.