
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
गरबा दांडिया फेस्टीवलमध्ये उत्साह आणि बुलढाणेकरांचे प्रेम पाहून भारावले असून बुलडाणा अर्बनच्या या उपक्रमामुळे यावर्षी पहिल्यांदा गरबा खेळल्याची भावना प्रसिद्ध सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी व्यक्त केली. तसेच बुलडाणा अर्बनच्या विविध उपक्रमांमुळे समाजऋण फेडण्याचे काम सातत्याने सुरु आहे. राधेश्याम चांडक यांच्या कल्पकतेमुळे बुलडाणा अर्बनेकडे माणसांची श्रीमंती देखील मोठी लाभल्याचे गौरवोद्गार यावेळी भार्गवी चिरमुले यांनी काढले.
बीसीसीएन बुलडाणा अर्बन यांचे वतीने गेल्या पाच दिवसांपासून स्थानिक शारदा कॉन्व्हेंटचे मैदानावर नवरात्रौत्सवानिमित्त सुरु असलेल्या गरबा फेस्टीवलमध्ये गरबा खेळणार्या कलावंतासह रसिकजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपारिक वेशभुषा व पोशाखात मुले-मुली, युवक-युवती व महिला अतिशय तल्लीन होवून संगीत गाण्यांच्या ठेक्यावर थिरकतांना दिसत आहे. दिवसेंदिवस गरबा महोत्सवात रंग भरत चालला असून तरुणाईला अक्षरश: उधाण आले आहे. गरबा महोत्सवाच्या काळात स्थानिक गरबा खेळाडूंचा जोश व उत्साह वाढविण्यासाठी आज प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले आल्या होत्या. यावेळी त्यांचे स्वागत कोमल झंवर यांनी केले. गरब्याचा आनंद घेत भार्गवी यांनी सुद्धा रसिककलावंतांसोबत फेर घेऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत केला.
याप्रसंगी बक्षिस वितरण समारंभात भार्गवी चिरमुले व संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते प्रिन्स ऑफ दि डे, प्रिन्सेस ऑफ दि डे, लिटील प्रिन्स, लिटील प्रिन्सेस, बेस्ट कॉस्चुम या व्यतिरिक्त, बेस्ट फाईव्ह बालगोपाल गटात, बेस्ट एलेव्हन लहान गटात, बेस्ट बारा मोठ्या गटात तसेच पंचेचाळीस प्रोत्साहनपर बक्षिसे लहान मोठ्या गटात देण्यात आले. याप्रसंगी भार्गवी चिरमुले यांनी स्पर्धकांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या आपण मुंबईत लहानाचे मोठे झालो असून गणपती उत्सवा सारखीच गरब्याची देखील वेगळी संस्कृती तेथे आहे. बुलढाण्यात गरबा दांडियाचा हा माहोल वेगळी उर्जा देणारा असून स्पर्धकांचे पदलालित्य, वेशभुषा आणि सादरीकरण यामुळे परिक्षकांचे सुद्धा परीक्षा होणार असून इतका छान गरबा येथे रंगल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाणा अर्बनमुळे केवळ अर्थपुरवठाच केला जात नाही तर समाजाच देणं लागतं म्हणून वेगवेगळे उपक्रम देखील राबविले जातात. आर्थिक उलाढाल करणार्या अनेक उद्योगपतींच्या किंवा मोठ्या आसामींच्या मागे माणसांची श्रीमंती कमी असल्याचे चित्र दिसते. मात्र भाईजींच्या कल्पकतेमुळे आणि समाजऋण फेडण्याच्या दातृत्वामुळे बुलढाणा अर्बनकडे माणसांची श्रीमंती देखील मोठी असल्याची प्रतिक्रिया भार्गवी चिरमुले यांनी व्यक्त केली.
गरबा महोत्सवाचे संचालन करण्यासोबतच लालाभाई माधवाणी व चंद्रशेखर जोशी सहभागी कलाकारांचा उत्साह वाढवित आहे. नवरात्रौत्सवात सुरु राहणार्या गरबा फेस्टीवलचा रसिक प्रेक्षकांनी आनंद घ्यावा असे आवाहन गरबा उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
































































