
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आपल्या सहजसुंदर अभिनयासोबत विनोदी लेखनासाठीही प्रसिद्ध आहेत. प्रभावळकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ‘स्टोरीटेल’ने नुकतेच त्यांच्या चार वेगवेगळ्या धाटणीचे लेखसंग्रह ऑडिओ स्वरूपात आणले आहेत. या सर्व लेखांचे सादरीकरण प्रत्यक्ष प्रभावळकरांच्या आवाजात ऐकायला मिळत आहेत.
क्रिकेट, खेळाडू, खेळाडूंचे वर्तन, मैदानाबाहेरील घडामोडी अशा अनेक गोष्टींवर प्रभावळकरांनी खुमासदार लेख लिहिले. खळखळून हसायला लावणारे, वरकरणी मनोरंजनात्मक भासणारे हे लेख विसंगती टिपणारे आणि चिमटे काढणारेही आहेत. या लेखांचा संग्रह म्हणजे ‘नवी गुगली’. ‘षट्कार’ या क्रीडा-मासिकात प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे ‘गुगली’. त्यांचा विनोदी ललित लेखसंग्रह ‘हसगत’ ऐकतानाही अशीच मजा येत राहते. प्रभावळकरांनी आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध ‘पत्रापत्री’त आहे. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात.


























































