भाजप नेत्यांच्या सेलिब्रेशनवर निशाणा साधत प्रसिद्ध अभिनेत्याने केले उद्धव ठाकरेंचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भावनिक साद घालत पदत्याग केल्याचे सांगितले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावरून दु:ख व्यक्त केले जात होते. त्याच दरम्यान भाजपने त्यांचा जल्लोष सुरू केला होता. ताज हॉटेलमध्ये थांबलेले भाजपचे नेते एकमेकांना लाडू पेठे भरवून त्यांचा आनंद साजरा करत होते. त्यावरून प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी भाजप नेत्यांना फटकारत उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

प्रकाश राज यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करत त्यांचे कौतुक केले आहे. यातच त्यांनी भाजपचा चाण्यक्या असा उल्लेख केला आहे. ”प्रिय उद्धव ठाकरे सर तुम्ही खूप चांगले काम केलेत. मला खात्री आहे तुम्ही ज्याप्रकारे महाराष्ट्रातील स्थिती सांभाळलीत त्यासाठी महाराष्ट्रातील जनता कायम तुमच्यासोबत उभी राहिल. चाणाक्य आज जरी लाडू खात असतील… तरी तुमचा प्रामाणिकपणा हा कायम लोकांच्या स्मरणात राहिल. तुम्हाला अधिक शक्ती मिळो”, असे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले आहेत. इंदिरा जयसिंग यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणाल्या. ”देवेंद्र फडणवीस आता नवीन विधानसभा अध्यक्ष नेमतील. त्यामुळे आधीच्या उपाध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील. मग आता 11 जुलैला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?” असा सवाल त्यांनी या ट्विटमधून केला आहे. ते ट्विट रिट्विट करत प्रकाश राज यांनी एक उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे. ”आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार… जेव्हा सर्वोच्च नेते व त्यांच्या चाणक्यांनी आधीच सर्व निर्णय घेतलेले आहेत”