अभिनेता रणवीर सिंगला खंडणीसाठी धमकीचा मेसेज, मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या, हल्ल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे धमकीचा संदेश मिळाला आहे. या मेसेजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता रणवीर सिंगच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिस आता धमकी देणारी व्हॉइस नोट पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. पाठवणारा बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा करत आहे.

३१ जानेवारी रोजी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या घरी गोळीबार झाला होता. शेट्टी यांच्या घराबाहेर पाच राउंड गोळीबार झाला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला शस्त्र पुरवठादार आसाराम फासले गेल्या चार वर्षांपासून गॅरेज मेकॅनिकच्या वेशात बिश्नोई टोळीसाठी काम करत असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता . हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई टोळीने केला होता.