
प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुबोधने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली. सुबोधसह त्यांची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तिघांनीही स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे.
मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे.
तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत.
तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
गणपती बाप्पा मोरया— Subodh Bhave (@subodhbhave) August 31, 2020
सुबोध भावे सध्या गोरेगाव येथील बिंबिसार नगर येथील घरी असून ते सुखरूप आहेत. डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. ‘मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.’ असा सल्ला सुबोध यांनी दिला. सुबोधच्या या ट्विटनंतर ते आणि त्याचं कुटुंब या आजारातून लककर बरे व्हाके यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करीत आहेत. सुबोध यांनी कोरोना काळात सातत्याने रंगमंच कामगारांना, कलाकारांना आणि गरजू रंगकर्मींना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे.
काही दिवसांपूर्वी सुबोध आपल्या कुटुंबासह गणपतीसाठी पुण्याला गेले होते. तिथून मुंबईत आल्यानंतर त्यांच्या पत्नीला सौम्य ताप आला होता. त्यानंतर पत्नी मंजिरी यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सुबोध आणि कान्हा यांची टेस्ट आज पॉझिटिव्ह आली. धाकटा मुलगा मल्हार याला कोरोनाची लागण झालेली नाही, असे सुबोध यांनी सांगितले.


























































