आणखी एका अभिनेत्रीने घेतला घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या व मोठ्या पडद्याच्या चंदेरी दुनियेत सध्या घटस्फोटांचे सत्र सुरू आहे. बॉलिवूडमधील अर्जुन रामपाल याने घटस्फोटासाठी अर्ज केलेला असतानाच छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने देखील तिचा आठ वर्ष संसार केल्यानंतर पतीसोबत काडीमोड घेतला आहे. छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री जुही परमार व अभिनेता सचिन श्रॉफ यांचा घटस्फोटाचा अर्ज वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने मान्य केला असून आता ते औपचारिकरित्या विभक्त झाले आहेत. या दोघांनी २० डिसेंबर रोजी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

sachin-shroff-juhi

सचिन आणि जुहीचा २००९ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षाची समायरा ही मुलगी देखील आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असून जुही गेल्या वर्षभरापासून सचिनपासून वेगळी राहत होती. जुहीने बिग बॉसचे पाचवे सिझन जिंकल्यानंतर या दोघांमध्ये दूरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते. सचिन व जुहीचा घटस्फोट हा जुहीच्या रागीट स्वभावामुळे झाल्याच्या देखील बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या, मात्र जुहीने एका मुलाखतीत ती रागीट नसून ते दोघे कधीच एकमेकांसाठी योग्य नव्हते, त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. “मी आणि सचिन फार वेगळे आहोत. आम्ही कधीच एकमेकांसोबत खूष राहू शकलो नाही. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांपासून आमच्यात काही ना काही प्रॉब्लेम व्हायला लागले होते. तरीही आम्ही दोघांनीही एकमेकांना संधी देत आठ वर्ष एकत्र काढली पण गेल्या वर्षी आम्ही ठरवलं की आम्ही एकमेकांसोबत नाहीच राहू शकत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहोत. आम्ही दोघांनीही एकत्र चर्चा करून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आमची मुलगी समायरा ही माझ्याकडे राहणार आहे. मी सचिन कडून कुठल्याही प्रकारची पोटगी घेणार नाही पण मुलीच्या भविष्यासाठी येणारा खर्च आम्ही दोघं मिळून करणार आहोत, असे जुहीने या मुलाखतीत सांगितले होते.