
जुहू येथे संपत्तीच्या वादातून मुलाने आईची हत्या केली होती. हत्या झालेली ती महिला अभिनेत्री वीणा कपूर असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. नावात साम्य असल्याने नेटकऱयांनी अभिनेत्री वीणा कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. अखेर वीणा कपूर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मी जिवंत असल्याचे पोलिसांना सांगितले. सोशल मीडियावर बदनामी प्रकरणी त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात एका यूटय़ुब चॅनल विरोधात तक्रार दाखल केली.
काही दिवसांपूर्वी जुहू येथे संपत्तीच्या वादातून मुलाने आईची हत्या केली होती. ज्या महिलेची हत्या केली होती तिचे नाव वीणा कपूर होते. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री वीणा कपूर यांचे फोटो व्हायरल झाले. अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर काहांनी वीणा कपूर यांच्या मुलाला इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. श्रद्धांजलीचे ट्विट आणि मुलाला येणारे फोन या त्रासाला कंटाळून अखेर अभिनेत्री वीणा कपूर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवांमुळे वीणा कपूर यांना नाहक त्रास झाला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर देखील झाला आहे. त्या अफवेने वीणा कपूर यांना काम मिळणे अवघड झाले आहे.नावात साम्य असल्याने वीणा कपूर यांना हा नाहक त्रास झाला आहे.


























































