
सामना प्रतिनिधी । मुंबई
दातांच्या मदतीने मृतांची ओळख पटवणारी फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी ही स्वस्त आणि वेगवान प्रक्रिया आहे. सध्या हिंदुस्थानात केवळ तीन ते चार ठिकाणी फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी होते. या क्षेत्रात अधिकाधिक तज्ञ निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. तसेच फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी या विषयाचा दंत अभ्यासक्रमात समावेश करा, अशी मागणी दंततज्ञांनी केली.
द इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी या विषयावर नुकताच एक परिसंवाद झाला. यावेळी हिंदुस्थानातील प्रशिक्षित न्यायवैद्यकतज्ञांचा तुटवडा असल्याचा विषय अधोरेखित करण्यात आला. यावेळी शेठ जी. एस. मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाच्या न्यायवैद्यक दंततज्ञ डॉ. हेमलता पांडे म्हणाल्या, डीनएनए प्रक्रियेच्या तुलनेत वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेली प्रक्रिया म्हणजे फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजी असून तिचा दंत अभ्यासक्रमात समावेश करा. या क्षेत्रात जास्त तज्ञ निर्माण व्हावेत यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज आहे. इटलीचे फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजिस्ट डॉ. एमिलिओ नुझोलीज यांनीही परिसंवादात भाग घेत न्यायवैद्यक दंततज्ञाच्या माध्यमातून ४७ देशांमध्ये १०० सल्लागार कार्यरत असल्याचे सांगितले.
फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजीचा उपयोग
मानवी अवशेषांची ओळख पटवणे, मृतांची ओळख पटवणे, अंगावरील व्रणांच्या जखमांचे मूल्यमापन करणे, वयाचा अंदाज, गैरव्यवहार प्रकरणे, शोषण प्रकरणांचे मूल्यमापन अशा सात प्रकारांत फॉरेन्सिक ऑडोंटॉलाजीचा उपयोग होऊ शकतो.






























































