मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुरेश काकाणी

612

मुंबई महागरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या जागी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काकाणी यांनी शुक्रवारी अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

काकाणी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2003 च्या बॅचचे अधिकारी आहेत. नगर विकास विभागाचे सह सचिव, मीरा- भाईंदर महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेडचे जिल्हाधिकारी या राज्य शासनाच्या विविध पदांच्या जबाबदाऱया त्यांनी हाताळल्या आहेत. तसेच केंद्र शासनाचा ‘स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. काकाणी यांनी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करून त्याचे यशस्वीरीत्या परिचालन करणे, नागपूर विमानतळाला व्यावसायिकदृष्टय़ा नफ्यामध्ये आणणे, पुण्यातील पुरंदर, अमरावती व चंद्रपूर विमानतळाच्या विकासास चालना देणे तसेच नागरी किमान वाहतुकीच्या धोरणाचा मसुदा तयार करणे आदी महत्त्वपूर्ण जबाबदाऱया आपल्या कारकीर्दीत पूर्ण केल्या आहेत.

अश्विनी जोशी यांच्यासह तीन सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

प्रशासनातील तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई पालिकेतील रिक्त झालेल्या जागेवर डॉ. अश्विनी जोशी यांच्या जागी महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एम. काकाणी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे सह निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांची बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या