
>>दिव्या नेरूरकर-सौदागर
वर्तणूक किंवा इतर तत्सम आजार हा कधीही एकटा नसतो. उलट त्याच्याकडे दुर्लक्ष (जाणूनबुजून अथवा अजाणतेपणाने) झाल्यास तो बऱयाचशा मानसिक समस्याही आपल्यासोबत घेऊन येत असतो. ताण/नैराश्य, भीती या त्यापैकीच समस्या आहेत, ज्या योग्य त्या समुपदेशनानेच सोडवता येतात. चंचलता किंवा ADHD ही समस्या लहान वयात जर लक्षात आली तर औषधं आणि मानसोपचारांद्वारे (ऑक्युपेशनल थेरपी/बिहॅवियर मॉडिफिकेशन थेरपी आणि समुपदेशन) आटोक्यात आणण्यात येते. ही समस्या मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणालाही असू शकते.
आपल्या मनाचा आपल्या शरीरावर खूप प्रभाव असतो. मन जर सुदृढ असेल तर शरीर सुदृढ राहू शकते. मन जर सतत आजारी असेल तर शरीरही सारखे आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्या मनाला योग्य पद्धतीने जपणे फार महत्त्वाचे असते. आपलं शरीर जसं त्याला झालेल्या किंवा होणाऱया आजाराची पूर्वकल्पना आपल्याला देतं तसंच आपलं मनसुद्धा जर त्याला आजार होणार असेल तर आपल्याला जाणीव करून देत असतं.
सतत निरुत्साह वाटणे, कुठलीही जबाबदारी किंवा काम करण्याची इच्छा न होणे, सतत झोपावेसे वाटणे किंवा झोप न लागणे, स्वतःचा राग, ताण, दुःख यांसारख्या भावनांवर ताबा नसणे, भूक न लागणे किंवा भरपूर भूक (Emotional Eating) लागणे ही काही लक्षणे आहेत, जेव्हा आपलं मन ‘‘मी ठीक नाही आहे’’ हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतं, पण बऱयाचदा मनाची दुखणी ही नजरेआड केली जातात. काही वर्षांनी हीच दुखणी मोठं स्वरूप धारण करतात आणि त्या वेळेस योग्य मानसोपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो.
ईशाचं (नाव बदलले आहे) तसंच काहीसं झालं होतं. ईशा ही लहानपणापासूनच भयंकर मस्तीखोर अशी मुलगी होती. एका जागी शांत बसणं हे तिला जमायचंच नाही. दिवसभराच्या तिच्या मस्तीला तिचे आईवडीलही कंटाळून जायचे. ईशाला खेळणं, हुंदडणं भरपूर आवडायचं. त्यात मग तिचं अभ्यासात दुर्लक्ष व्हायचं. असंच तिच बालपण सरलं. आता ती मोठी झाली होती. एका नामांकित संस्थेमध्ये ती एक क्रिएटिव्ह हेड म्हणून नोकरी करीत होती. मनासारखी नोकरी, पद असूनदेखील ईशाला हल्ली कामाचा ताण असह्य होत होता. तिचे वरिष्ठ हल्ली तिच्या कामाच्या पद्धतीवर नाखूष होते. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ईशा आणि तिची टीम घरूनच जास्तीत जास्त काम करत होती, पण ईशाला काही एका जागी शांत बसून आणि एकाग्र होऊन काम करणं काही जमत नव्हतं. ती काम करायला बसली की, तिची चळवळ सुरू व्हायची. मग कधी पाणी प्यायला उठ, तर कधी गॅलरीत डोकाव असं तिचं व्हायचं.
तासनतास चालणाऱ्या मीटिंग्समध्ये तिचं लक्ष नसायचंच. कारण वीस मिनिटांवर तिला एकाग्र व्हायला जमत नव्हतं. म्हणून मग ती आता घाबरूनही जात होती. ग्रुप मीटिंग्सना तिचा सहभाग नावापुरता होत होता. वरिष्ठ किंवा इतर कोणी बोलत असताना तिला प्रचंड ताण येत होता आणि ती अक्षरशः गोंधळून जात होती. सरतेशेवटी ईशाने तिच्या भीती आणि ताणावर उपाय म्हणून समुपदेशनाचा मार्ग अवलंबायचा ठरवले. त्याप्रमाणे तिने सत्रे घ्यायला सुरुवातही केली. ईशाला ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘चंचलता किंवा अस्थिरता’ नावाची वर्तनीय समस्या होती, जी तिला शाळेत असण्याच्या वयापासूनच सुरू झालेली होती. मात्र ‘अशा प्रकारची समस्या मुलीलाही असू शकते’ हे काहीसं तिच्या पालकांनी स्वीकारलं नव्हतं.
वर्तणूक किंवा इतर तत्सम आजार हा कधीही एकटा नसतो. उलट त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यास तो बऱ्याचशा मानसिक समस्याही आपल्यासोबत घेऊन येत असतो. ज्या योग्य त्या समुपदेशनानेच सोडवता येतात. ईशाला जेव्हा या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले तेव्हा तिने लगेच चंचलतेवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ते औषधोपचार आणि समुपदेशन सुरू केले. मात्र तिला लगेच यश मिळाले नाही. कारण तिची चंचलता आणि तिचा होत असलेला मूड स्विंग यामुळे तिची सत्रे जवळपास तीन ते साडेतीन वर्षे चालली, पण जेव्हा केव्हा ती समुपदेशनाला येत होती, त्यावेळी ती प्रामाणिक प्रयत्न करत होती.
चंचलता किंवा ADHD ही समस्या लहान वयात जर लक्षात आली तर औषधं आणि मानसोपचारांद्वारे (ऑक्युपेशनल थेरपी/बिहॅवियर मॉडिफिकेशन थेरपी आणि समुपदेशन) आटोक्यात आणण्यात येते. ही समस्या मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणालाही असू शकते. दुसरे महत्त्वाचे असे की, यावर उपाययोजना करताना पालकांनी काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात. त्या अशा की;
- चंचलतेवर पटकन नियंत्रण येणे शक्य नसते. कारण अशा मुलांमध्ये ऊर्जा ही प्रचंड असते. म्हणूनच ही मुलं चळवळी असतात. पटकन थकत नाहीत. यासाठीच त्यांना शारीरिक कामं (थोडीफार जबाबदारीची) जसे की, स्वयंपाकाच्या भांडय़ांची ने-आण, घरातील आवराआवरीला मदत करवून घेतली तर त्यांच्या अतिऊर्जेला चालना मिळू शकते आणि ती कुठल्याही प्रकारची नासधूस करत नाहीत. भरपूर मैदानी खेळ आणि व्यायाम प्रकारसुद्धा अशा मुलांना करू देणं चांगलं.
- मुलांना अशा वेळेस हाही संदेश नकळतपणे मिळत जातो की, त्यांच्यावर त्यांच्या पालकांचा अजूनही विश्वास आहे. मुलांना मग जबाबदारीचे भान येत जाते. कारण अशा मुलांना समोर बसवून या काही गोष्टी शिकवणं शक्य नसतं. ती एका जागी काही मिनिटांच्या वर स्वस्थ बसू शकत नाहीत.
- मुलांमध्ये जरी अर्धा टक्का चांगला फरक दिसत असल्यास त्यांना कौतुकाची थाप दिली तर त्यांच्यामध्ये पुष्कळ चांगला परिणाम दिसून येतो.
हे झालं लहान मुलांबद्दल, पण हाच ADHD जर लक्षात न येता मोठेपणीही कायम राहिला तर अशा मोठ्या माणसांना वेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण अशा माणसांना कुठल्याही परिस्थितीशी पटकन जुळवून घेता येत नाही. - ‘आपण सामान्य नाही. आपल्यात काहीतरी कमी आहे’ ही जाणीवच त्यांच्या मनात आत्मविश्वास गमावण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच अशा वेळेस चिडचिड/राग, भीती, ताण या मानसिक समस्या निर्माण होतात. अशा वेळेस समुपदेशनाद्वारे त्यांना मदत मिळते.
शेवटी कोणीही कितीही वयाचा असो, ‘संयमानेच’ अशा व्यक्तीस किंवा मुलास समजून घेतल्यास त्यांच्यामध्ये बदल घडून येतात. कारण त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]






























































