गोराईमध्ये घडणार ‘मॅन्ग्रोव्ह पार्क’ सफर! उपक्रम लवकरच सेवेत आदित्य ठाकरे यांची माहिती

गोराई येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘मॅग्रोव्ह पार्क’ सफर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्सवर’ प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली आहे.

महाविकास सरकारच्या काळात ऑक्टोबर 2021 मध्ये या कामाचे भूमिपूजन झाले आहे. मलबार हिल येथील ‘ट्री टॉप वॉक’, मरोळमधील ‘अर्बन फॉरेस्ट’ यांची कामेही महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ही कामे 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र महायुती सरकारच्या काळात ही कामे रखडली होती. मात्र पर्यावरण मंत्री म्हणून त्या काळात काम सुरू केलेले प्रकल्प आता मुंबईकरांच्या सेवेत येत असल्याबद्दल आनंद होत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.