पालिकेचे विद्यार्थी देणार ‘हेल्दी स्माइल’, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पांढरेशुभ्र स्वच्छ दात आणि तोंडांच्या उत्तम आरोग्यामुळे पालिका शाळांतील लाखो विद्यार्थी आता ‘हेल्दी स्माइल’ देणार आहेत. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज मालाड पश्चिम चिंचोली महापालिका शाळेत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक उपस्थित होत्या.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी आणि दात मजबूत ठेवण्यासाठी गेल्या वर्षीपासून हा ‘स्कूल ओरल हेल्थ प्रोग्रॅम’ राबविण्यात येत आहे. यामध्ये गेल्या वर्षी या उपक्रमात 24 वॉर्डांमधील 870 शाळांमधील 1 लाख 11 हजार 656 विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. डॉ. संदेश मयेकर यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वर्षी या उपक्रमाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करून 228 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, नगरसेकिका योगीता कोळी, माजी नगरसेकक अजित भंडारी, मधुकर राऊत, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, डॉ. संदेश मयेकर, शिक्षणाधिकारी (प्र.) प्रकाश चऱहाटे आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. संदेश मयेकर यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून घ्यावयाची काळजी आणि निगा याबाबत मार्गदर्शन केले.

‘आदित्य संवादा’मुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
युवकांचे प्रेरणास्थान असलेले खुद्द आदित्य ठाकरे आपल्या शाळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे शाळेत येताच विद्यार्थ्यांची त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी एकच झुंबड उडाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.