
काँग्रेसमुळे रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा, पायाभूत सेवा या सगळ्यात महाराष्ट्र पिछाडीवर गेला. देशभरातून लोकांनी काँग्रेसला पळवून लावले तसेच महाराष्ट्रातून काँग्रेसला पळवून लावण्याची वेळ आली आहे. या काँग्रेसने लोकांच्या खिशात हात घालून लोकांना लूट लूट लुटले, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी विरोधकांवर केला.
लोकसभेला जो विश्वास दाखवलात त्यामुळे देश भगवा झाला. तो रंग महाराष्ट्राचा असून निवडणुकीनंतर महाराष्ट्र भगवा होणार. कारण महायुतीचीच सत्ता येणार आहे असा विश्वासही आदित्य यांनी व्यक्त केला. महायुतीचे पुरंदर-हवेलीचे उमेदवार विजय शिवतारे, भोरचे उमेदवार कुलदीप कोंडे, जुन्नरचे उमेदवार शरद सोनावणे आणि खेड-आळंदीचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या झंझावाती सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते.
…म्हणून यांच्या पोटात दुखते
1995 ते 1999 आणि 2014 ते 2019 या कालावधीत युतीच्या सरकारने अनेक विकासकामे केली, मात्र पंधरा वर्षांत काँग्रेसने एक तरी विकासकाम केले का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. गेल्या पाच वर्षांत बंद पडलेले अनेक प्रकल्प युतीच्या सरकारने मार्गी लावले आहेत. 2010 साली जी कामे व्हायला हवी होती ती कामे युती सरकारला 2020 साली करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या हातातून सत्ता हिसकावून घेतल्याने यांच्या पोटात दुखत आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
































































