महापालिका निवडणूक आघाडीतील सर्वांनी एकत्र लढावी, आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार विकासाची कामे करत आहे. कोविडच्या काळातही ही विकासकामे थांबली नाहीत. आगामी पालिका निवडणुका लागतील तेव्हा आघाडीतील सर्वांनी एकत्र लढावे, असे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ‘संवाद’ या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, मागच्या वर्षी कोविडच्या काळात रुग्णांची संख्या जास्त होती त्यामुळे या प्रकारे कार्यक्रम घेता येत नव्हते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप दिवसांनंतर शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र आले आहेत. कोरोनाकाळात आणि लसीकरणाच्या कामात शिवसेनेचे पदाधिकारी अग्रेसर राहिले आहेत. या पदाधिकाऱ्यांचे काही संकल्प आहेत. हे जाणून घेण्यासाठी हा ‘संवाद’ कार्यक्रम आयोजित केला होता.

पुणे–पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेची ताकद वाढवा

शिवसेनेचा आवाज बुलंद करूनच पुढे जायचे आहे. पुणे जिह्यात शिवसेनेची ताकद वाढत असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहातही शिवसेनेची ताकद वाढवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे संवाद साधण्यासाठी उभे राहिले त्यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगे बढो’, अशा जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. हा जोश पाहून आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्हा सर्वांना भेटून मला आनंद होत आहे. पण, अनेकांनी चेहऱ्यावरून मास्क खाली घेतले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचा फोटो दाखविला तर ते नक्की विचारतील, किती लोकांनी मास्क लावले होते. त्यामुळे सर्वांनी मास्क लावा, असे त्यांनी सांगितले.