नगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी 09 डिसेंबर 2018 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी नगर शहरातील 17 प्रभागातील प्रत्येकी चार या प्रमाणे 68 जागांसाठी 337 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असून प्रशासन सज्ज झाले आहे.

मतदारांनी मतदानाला येताना मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, पारपत्र, बँक/पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, पॅन कार्ड, आधारकार्ड यासारखे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपले नांव ज्या प्रभागाच्या मतदान यादीमध्ये आहे त्या प्रभागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचेकडून यादीतील अनुक्रमांक तात्काळ उपलब्ध होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना संबंधित मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदारास त्यांचे प्रभागात प्रभाग अ, ब, क आणि ड असे प्रत्येकी एक मत याप्रमाणे एकूण 4 मते देण्याचा अधिकार आहे. मतदान कक्षात बॅलेट युनिटवर वर्गवारीनुसार प्रभागाचा वर्ग अ मतपत्रिकेचा रंग पांढरा, प्रभागाचा वर्ग ब मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, प्रभागाचा वर्ग क मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा आणि प्रभागाचा वर्ग ड मतपत्रिकेचा रंग फिका निळा असे प्रवर्गानुसार गट निश्‍चित करण्यात आलेले आहेत. एका प्रभागाचे सर्व बॅलेट युनिट एकाच मतदान कक्षात (वोटींग कंपार्टमेंट) मध्ये राहणार असून प्रभाग निहाय अ,ब,कआणि ड अशा मतपत्रिका त्यामध्ये असणार आहे. मतदारास निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास नोटाचा पर्याय उपलब्ध आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी निवडणूक प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रांत मतदार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांना मोबाईल फोन आणि इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास व त्याचा वापर करण्यास मनाई आहे.

सर्व मतदारांनी कुठल्याही अमिषाला किंवा प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, तसेच मतदान करण्यासाठी कुठलीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचे अमिष किंवा प्रलोभन दाखवित असल्यास आचारसंहिता कक्ष प्रमुख उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित (भ्रमण दूरध्वनी क्र.9665669777) किंवा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र वाघ (भ्रमण दूरध्वनी क्र.9423468111) यांचेकडे तक्रार करावी, असे अवाहन जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.