गडहिंग्लजमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी संभ्रम; धोरण निश्चितीसाठी शिवसेनेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

335

दहावीचे निकाल लागल्यानंतर आता अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रियेबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याने गडहिंग्लजमध्ये महाविद्यालयात गर्दी होत आहे. त्याचा फायदा घेत संस्था इन हाऊस ‘कोटा’च्या माध्यमातून पैशांची मागणी करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रवेशाबाबतचे ठोस धोरण ठरवून कार्यवाही व्हावी, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

गडहिंग्लज परिसरात दरवर्षी विज्ञान शाखेतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होते. तर कला व वाणिज्य शाखेतील प्रवेश महाविद्यालय स्तरावर होतात. मात्र या दोन्ही प्रकारच्या प्रवेशाबाबत कोणतेही धोरण स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. प्रवेशाच्या जागा कमी आणि उत्तीर्ण विद्यार्थी संख्या जास्त असल्याने सर्व विद्यर्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असल्याने महाविद्यालयात स्वतःची प्रवेश यंत्रणा असत नाही. तरीही महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत इन हाऊस व संस्था कोटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करत आहेत. यामध्ये परिसरतील ग्रामीण, गरीब व हुशार विद्यार्थी भरडले जात आहेत. त्यामुळे या प्रवेशप्रक्रियेबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर यावर्षीचे अकरावी प्रवेशाचे निश्चित धोरण तातडीने ठरवले जावे. तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष ठेवून प्रवेश प्रक्रिया सुरळीत व पारदर्शीपणे होणे गरजेचे आहे. तसेच या प्रक्रियेतून प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीची जिल्हा शिक्षण उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केली जावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख सागर कुराडे, तालुका युवासेना प्रमुख अवधूत पाटील, शहर उपप्रमुख काशीनाथ गडकरी यांच्या सह्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या