
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
राफेल लढाऊ विमान खरोखरच एक अफलातून फायटर जेट आहे. त्याच्या समावेशाने हिंदुस्थानी हवाई दलाच्या सामर्थ्यात अनेकपटीने वाढ होईल असा दावा हिंदुस्थानचे हवाई दल उपप्रमुख एस बी देव यांनी केला आहे .५८ हजार कोटींच्या राफेल सौद्याला विरोध करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हवाईदल उपप्रमुखांनी केलेले मतप्रदर्शन हा चर्चेचा विषय ठरला आहे.
राफेल सौद्याबाबत टिप्पणी करणे हा माझा विषय अथवा हक्कही नाही,असे सांगून हवाई दल उपप्रमुख देव म्हणाले ,फ्रान्सचे राफेल जेट हे खरोखरच एक शक्तिशाली आणि सुंदर लढाऊ विमान आहे. आम्ही त्याची आतूरतेने प्रतीक्षा करीत आहोत .त्याची उड्डाणाची अफलातून क्षमता आणि त्यातील हायटेक सुविंधांमुळे हिंदुस्थानी हवाईदलाच्या लढाऊ क्षमता अनेकपटींनी वाढणार आहे. राफेल सौद्याला विरोध करणाऱ्यांनी खरेदीप्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करूनच आपले धोरण ठरवले असे आवाहनही देव यांनी केले
राफेल करारवरून काँग्रेस भाजपला घेरण्याचा तयारीत
यूपीए सरकारने ज्या विमानांसाठी करार केला होता. तेच विमान मोदी सरकारने तिप्पट किंमतीने खरेदी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. नव्या व्यवहारात कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याबाबत करार झालेला नाही. माजी संरक्षण मंत्री ए के अँटनी यांच्या मते यूपीए सरकारच्या व्यवहारानुसार १२६ पैकी १८ विमाने ही फ्रान्समध्ये होणार होती. तर उर्वरित विमानांची निर्मिती हिंदुस्थान एरॉनॉटिक्सद्वारे हिंदुस्थानात होणार होती. काँग्रेसने राफेल मुद्यावरून देशभरात सुमारे १०० हून अधिक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या कार्यकारिणीने अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर याप्रकरणी बैठकही घेतली आहे. पक्षाने याप्रकरणी मोदी सरकारला घेरण्याची योजना आखली आहे.
सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात करणार सुनावणी
राफेल सौद्याला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका याचिकाकर्ते वकील मनोहरलाल शर्मा यांनी केली आहे .सरन्यायाधीश दीपक मिश्रा ,न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ती दाखल करून घेत त्यावर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी करील असे सांगितले.






















































