बंदुकीच्या कवचापासून अफगाणी महिला बनवताहेत दागिने, वाचा ‘ट्रेंच आर्ट’ विषयी….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंदुकीतून निघालेल्या गोळ्या या फक्त विनाश आणतात. फक्त बंदूकच कशाला, युद्धात वापरलं जाणारं प्रत्येक शस्त्र हे प्रत्येक घावासोबत शांतता आणि जीवन यांच्या चिंधड्या करत असतं. पण या सगळ्या पलिकडे जाऊन माणसाची विशेषतः स्त्रियांची सृजनाची प्रेरणा अत्यंत आदिम आहे आणि त्याचं प्रत्यंतर अफगाणी महिलांच्या कलाकुसरीतून आलं आहे.

अफगाणिस्तानातील महिलांचं जीवन अतिशय संघर्षपूर्ण आहे. सतत दहशतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या या स्त्रियांनी या दहशतवादाला देखील कलात्मक रुप दिलं आहे. अफगाणी महिला या सध्या ‘ट्रेंच आर्ट’ म्हणजे युद्धजन्य वस्तूंपासून कलानिर्मिती करत आहेत. त्यात विविध प्रकारचे कानातले झुमके, छल्ले आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. हे दागिने बनवण्यासाठी त्या बंदुकीच्या गोळीचं कवच, बॉम्बचं कवच यांचा वापर करत आहेत.

या महिलांनी बनवलेल्या वस्तुंना जगभरातून प्रचंड मागणी आहे. लोकांना युद्धातील शस्त्रांपासून बनवलेले दागिने आणि शोपीस आपल्या दिवाणखान्यात सजवून ठेवण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ट्रेंच आर्टचा इतिहास

वास्तविक ही कला पहिल्या महायुद्धादरम्यान सुरू झाली. जगभरातील तरुणांना त्यांच्या देशांच्या सरकारांनी युद्धावर पाठवलं. त्यात अनेक कवी, कलाकार आणि शिक्षकांचा भरणा होता. आपल्या देशापासून हजारो किमी दूर आलेल्या अनेक तरुणांनी आपल्यातील कला जिवंत ठेवण्यासाठी हातातील शस्त्रांच्या सामग्रीचा वापर करून कलाकृती निर्माण केल्या. युद्धातील कचऱ्यापासून दागिने बनवले. यातूनच ट्रेंच आर्ट या कलाप्रकाराचा जन्म झाला.