आदित्य ठाकरे यांच्या दणक्याने कामाला सुरुवात; विद्यार्थ्यांच्या समस्यांची घेतली दखल

283

सामना प्रतिनिधी । नगर

आमच्या कॉलेजच्या बाहेर कचरा पडतो, जनावरांचे मांस टाकले जाते, आमच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला, यासाठी आपण काय करणार, असा प्रश्न विद्यार्थिनीने उपस्थित केल्यानंतर मी लगेचच तुमचा प्रश्न सोडवतो असे आश्वासन शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी कॉलेजची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत अधिकार्‍यांना समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या. आदित्य ठाकरे यांच्या दणक्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत मनपाने जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छतेचे काम सुरू केले. आदित्य संवादाच्या वेळी राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थींनींनी आमच्या महाविद्यालयाच्या बाहेर कचरा टाकला जातो. हॉटेलमधून राहिलेले अन्न या ठिकाणी टाकले जाते, ही बाब आदित्य यांच्या निदर्शनास आणली. त्यावर आपण मंत्री रामदास कदम यांना येथे घेऊन येतो व तुमचा प्रश्न सोडवतो असे आश्वासन आदित्य यांनी दिले होते. त्यांच्या दणक्यानंतर कामाला जोमाने सुरुवात करण्यात आली.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी राधाबाई काळे महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी कचरा कसा टाकला जातो, कचर्‍याचे निरसन का होत नाही, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला विचारला. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तुमची आहे, या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, ही समस्या गंभीर आहे, याचे भान ठेवा असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत मनपाने जागृत राहिले पाहिजे. या ठिकाणी कोणताही कचरा टाकता कामा नये, या ठिकाणी स्वच्छता कशी राहील याची खबदारी घ्या, असे आदेशही त्यांनी आयुक्त भालसिंग यांना दिले. परिसराची स्वच्छता केल्यानंतर मनपाची स्वतःची जागा आहे, त्याठिकाणी कायमस्वरुपी उद्यान उभारता येईल, जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहील व उजळून निघेल याचे नियोजन करा. कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांची पुन्हा तक्रार येता कामा नये, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे असा इशाराही कदम यांनी दिला.

आदित्य ठाकरे है, तो मुमकिन है!

नगरच्या राधाबाई काळे कॉलेज विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांना कॉलेजजवळ कचरा आणि वाढत असलेली दुर्गंधी, खराब रस्ता याबद्दल तक्रार केली होती. त्यावर आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम व अनिल राठोड यांच्यासोबत पाहणी केली. त्यांनी आदेश दिल्यानंतर वीस मिनिटांत येथे जेसीबी येऊन काम सुरू झाले. आदित्य ठाकरे है तो मुमकिन है, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या