आईला कामावरून काढल्याने तरूणाचा कंपनीत राडा, टोळक्याच्या मदतीने केली तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

कंपनीत अन्य कामगार महिलांसोबत पटत नसल्यामुळे व्यवस्थापनाने महिलेला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग आल्यामुळे संबंधित महिलेच्या मुलाने साथीदारांच्या मदतीने कंपनीत राडा घालून तोडफोड केली. त्याशिवाय एकाला मारहाण करीत हातातील कोयत्याने दशहत निर्माण केली. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास कोंढव्यातील टाईनीग को. औद्योगिक कंपनीत घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाचजणांना अटक केली.

विकास राजेंद्र जानकर (वय 22, रा. कोंढवा बुद्रुक), केतन गंगाराम मोरे (वय 21, रा. पिसोळी), राजेश संभाजी चव्हाण (वय 26, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) सागर मुकूंद अहिरराव (25), चेतन किशोर पाटील (23) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीधर नायडू (वय 62, रा. वानवडी) यांनी तक्रार दिली आहे.

कोंढव्यात टाईनीग को. औद्योगिक कंपनी असून त्यामध्ये आरोपी सागर अहिरराव याची आई कामाला होती. मात्र, कामादरम्यान महिलेचे इतर कामगारांसोबत पटत नव्हते. त्यामुळे कंपनीने तिला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग सागरला होता. त्यामुळे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो साथीदारांसोबत कंपनीत गेला. त्याने श्रीधर यांना कोयत्याने मारून जखमी केले. त्यानंतर कंपनीतील तीन केबीनच्या काचा फोडून नुकसान केले. त्याशिवाय हातातील कोयता हवेत फिरवून कंपनीतील कामगारांमध्ये दशहत निर्माण केली.

आईला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून संबंधित मुलाने इतर साथीदारांच्या मदतीने कंपनीत तोडफोड केली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

स्वराज्य पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे