नागरिकांना कोटय़वधींचा गंडा घालणारा भामटा तीन वर्षांनंतर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एकदा गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा’ असे आमिष दाखवून नागरिकांना एक कोटी 30 लाखांचा चुना लावून गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या भामटय़ाला पार्कसाइट पोलिसांनी अखेर पकडले. लोकांचा पैसा घेऊन पळून गेलेला आरोपी ठिकठिकाणी लपून राहत होता.

अब्दुल कुद्रूस रौफ वळसंगकर (40) असे त्या भामटय़ाचे नाव आहे. पार्कसाइट येथे राहणाऱया अब्दुलने त्याच परिसरात कौशिक एंटरप्रायझेस नावाने दुकान थाटले होते. तेथेच त्याने ‘एकदा पैसे गुंतवा आणि चांगला परतावा मिळवा’ अशी योजना सुरू करून नागरिकांना पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कुर्ला, विक्रोळी, शीव, ऐरोली आदी ठिकाणच्या नागरिकांनी पैसा जमवून अब्दुलकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अब्दुलने लोकांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा दिला. त्यामुळे विश्वास वाढल्याने लोक आणखी गुंतवणूक करू लागले. करोडो रुपये जमल्यानंतर अब्दुल बायको व मुलांना घेऊन पसार झाला. त्याने मोबाईल व सीमकार्ड बंद केले.

अब्दुलने आपली फसवणूक केल्याचे कळताच नीतू सहानी (40) या गृहिणीने पार्कसाइट पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2019 मध्ये अब्दुलविरोधात तक्रार दिली. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण अब्दुल पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर तो टागोरनगर ग्रुप 4 येथे राहायला आला आणि सापडला. तो गुपचुप ओला चालकाचे काम करीत होता. एसीपी आनंद नेर्लेकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळाप्रसाद चव्हाण तसेच केतकर, ढेबे, गोसावी, पेडेकर या पथकाने टागोरनगर परिसरात सापळा लावून त्याला पकडले. अब्दुलने ज्यांची फसवणूक केली त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पार्कसाइट पोलिसांनी केले आहे.