
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना, कंत्राटीकरण विरोध व अन्य मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. अनेक वेळा मोर्चा, आंदोलन, निदर्शने करून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही पदरात काहीच पडले नाही. त्याच्या निषेधार्थ येत्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.
यापूर्वी एक दिवसाचा संप, मंत्रालयावर आक्रोश मोर्चा, धरणे आंदोलन, निदर्शने तसेच सह्यांची मोहीम अशी विविध आंदोलने केली. तसेच जानेवारी २०१७ व जुलै २०१७ मध्ये तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून आश्वासन दिल्याने संप स्थगित करण्यात आला होता. मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी तीन दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे. रायगड जिल्हा संघटना व सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. तशा प्रकारचे निवेदन उरणचे नायब तहसीलदार एन. व्ही. पेडवी यांना कर्मचारी वर्गाने दिले आहे.
या संपाची पूर्वतयारी व नियोजनाकरिता दिनांक १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अलिबाग चेंढरे येथील कॉ. र. ग. कर्णिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
























































